Monday, May 29, 2023

माझं शहर माझी जबाबदारी - स्वच्छ, हिरव्या नद्या आणि बरंच काही हवं!!!!

प्रिय मित्रांनो, 



जागरूक नागरिकांसोबत सेल्फी!

पुणे नदी पुनरुज्जीवन (पीआरआर) चळवळीचा भाग होणे हा एक आव्हानात्मक प्रवास आहे. पुणे महापालिकेने प्रस्तावित केलेली आपल्या नदीकिनाऱ्यांवरील तथाकथित 'पुनरुज्जीवन' योजना रद्द व्हावी आणि जीवितनदी संस्थेने सुचवलेला पर्यावरणपूरक पर्याय स्वीकारावा, यासाठी जीवितनदी या संस्थेच्या पुढाकाराने सुरू झालेल्या चळवळीत सहभागी नागरिक विविध प्रकारे प्रयत्न करत आहेत!


नदीच्या ज्या भागात या प्रकल्पाअंतर्गत बेसुमार विनाशकारी काम सुरू करण्यात आले आहे, त्या भागात अधूनमधून फेरीचे आयोजन केले जाते. मी बंड गार्डनच्या परिसरातील अशाच एका फेरीत सहभागी झाले होते. तिथे मी ५०० मीटरपेक्षा कमी अंतरावर सुमारे ७००-१००० वृक्षांची बेकायदेशीर कत्तल पाहिली. आपण कल्पना करू शकता की या पट्ट्यालगतची झाडी किती घनदाट आहे. या ७००+ वृक्षांमध्ये चांगले वाढलेले, पन्नास वर्षे किंवा त्याहून जुने स्थानिक वृक्षही होते. या वृक्षांसोबत हजारो पक्षी, सस्तन प्राणी, कीटक आणि सूक्ष्मजीव (एक चांगली जैवविविधता) नांदत होते. यातील काही वृक्षांचे म्हणे पुनर्रोपण होणार आहे... पण इथे जे नष्ट होत आहे त्यात झुडपांपासून वृक्षांपर्यंत विविध स्तरांमध्ये वाढलेली वनश्री आहे. अगदी चांगल्या नैसर्गिक जंगलाची एक छोटी प्रतिकृतीच जणू.




कापण्यासाठी चिन्हांकित केलेले परिपक्व झाड


मात्र, विकासाची प्रक्रिया जलद गतीने व्हावी, यासाठी या वनश्रीवर राडारोडा व दगड टाकून निर्दयीपणे हे जंगल नष्ट केले जात आहे. माझे सहकारी सत्या आणि उमा म्हणाले की, ते या झाडांना 'जिवंत समाधी' देत आहेत.


हे ज्या पद्धतीने होत आहे ते निव्वळ अनाकलनीय आणि अतार्किक आहे, जुनी वाढलेली सध्याची झाडे आणि घनदाट वनश्री नष्ट करून त्या जागी हिरव्या गवताचे ठिपके, ठरावीक अंतरावर नियोजन करून लावलेली  एकांडी झाडे आणि काँक्रीटच्या रचना उभ्या करण्यातून काय साध्य होते?  आपले नदीकाठ शाश्वत करण्यासाठी नक्कीच वेगळे मार्ग काढावे लागतील.



बांधकामाच्या ढिगाऱ्याखाली पडलेली झाडे आणि झुडपे

नदीपात्र कसे कार्य करते, त्याची वैशिष्ट्ये काय आहेत आणि नदी कोणत्या परिसंस्थिकीय सेवा पुरवते याच्या मूलभूत समजेचा अभाव येथे स्पष्टपणे दिसून येतो. नदीचे पाणी जलपर्णीने भरलेले (आपल्याला नको असलेली हिरवाई) आणि दुर्गंधीयुक्त आहे. हा भाग बोट क्लबचाही भाग असल्याने येथे नौकाविहाराची व्यवस्था करण्याची योजना आहे, मात्र जोपर्यंत नद्यांमध्ये सातत्याने स्वच्छ पाणी येत नाही, तोपर्यंत त्यात बोटी चालविणे किंवा नदीतले इतर कोणतेही उपक्रम राबवणे अशक्य आहे. नदी मेली आहे, तिचे पुनरुज्जीवन करायला हवे आहे! 



नदीमध्ये जलपर्णी

नदीपात्रातल्या या विध्वंसाबरोबरच तिथे चालू असलेल्या कामावरील मजूरांच्या वसाहतीतील दृश्यही निराशाजनक होते. कामगार, त्यांचे कुटुंबीय आणि लहान मुले पत्र्याच्या तात्पुरत्या झोपड्यांमध्ये राहत असून उन्हाच्या तीव्र लाटेला सामोरे जात आहेत. मात्र या झोपड्यांना पूर्ण वाढलेल्या झाडांच्या सावलीचाच काय तो आधार आहे. काय विडंबन आहे पहा! 



बांधकाम कामगारांची तात्पुरती वसाहत

कामगार व त्यांच्या कुटुंबियां अवस्था आणि नदीकाठावरील विध्वंसक काम पाहून नदीकाठ विकासाची ही सारी प्रक्रिया किती निष्काळजी आणि अज्ञानी आहे, याची जाणीव होते! नागरिकांचे जीवनमान उंचावणे हा या प्रकल्पाचा एक हेतू आहे, असे त्यांचे म्हणणे आहे, पण त्याचे प्रतिबिंब या प्रक्रियेतसुध्दा उमटलेले नाही! 


असे म्हटले जाते की आम्ही पर्यावरणवादी किंवा कार्यकर्ते किंवा जे काही नाव ते आम्हाला नावे देतात ते आम्ही सर्व विकासाच्या विरोधात आहोत… तर होय, आम्ही आहोत या असल्या विकासाच्या विरोधात! कारण हे २०२३ आहे आणि आपण अजूनही १९८० च्या दशकात असल्यासारखे काम करत आहोत. त्या काळात आपल्याला 'शाश्वतता' हा शब्द माहीत होता पण त्याचा अर्थ पुरता आकळलेला नव्हता. आपण आपल्या आजूबाजूच्या आपल्याच लोकांना आणि आपल्या पर्यावरणाला कधीही महत्व दिले नाही, परंतु आता वेळ आली आहे की आपण स्वत: ला वाचविण्यासाठी शाश्वततेच्या आधुनिक निकषांचे पालन केले पाहिजे आणि आपल्या विकासाच्या कल्पनेला शाश्वत विकास लक्ष्यांशी जोडून घेतले पाहिजे.  


जागतिक वातावरण बदलाच्या संकटामुळे वाढता उकाडा आणि दिवसागणिक हवामानात अचानक होणारे बदल यांना आपण सामोरे जात आहोतच. त्यात ही निष्काळजी, बेफिकीरी, पैसा कमावण्याची हाव आपल्याला परवडणारी नाही. आपली अर्थव्यवस्था भरभराटीला यावी जरूर, पण आपले पर्यावरण आणि आपले लोक यांचीही भरभराट व्हायला हवी!!!


शहरात होत असलेला हा तथाकथित विकास पाहिल्यानंतर एक जागरूक नागरिक म्हणून मला माझ्या प्रश्नाचे उत्तर हवे आहे - आपण कुठे जात आहोत???


कोणत्याही सुशोभीकरणाआधी आम्हाला मूलभूत सेवांची आवश्यकता आहे, त्यापैकी काहींची ही यादी.

प्रदूषणमुक्त व सुरक्षित सुरक्षित सार्वजनिक जागा .

स्वच्छ नद्या.

खड्डेमुक्त रस्ते .

योग्य सावली असलेले सुरक्षित वाहन तळ. 

वाहतुकीचे कार्यक्षम व्यवस्थापन.

चालणे आणि सायकल चालविण्यासाठी सुरक्षित रस्ते.

फक्त आवश्यक तिथेच उड्डाणपूल (आणि आपल्या टेकड्यांचा बळी देणारे उड्डाणपूल अजिबात नकोत).

कार्यक्षम कचरा व्यवस्थापन सेवा (अर्थातच वर्गीकरण केलेला कचरा कचरावेचकांना देण्याची जबाबदारी नागरिकांची!) 100% सेंद्रिय कचऱ्याचे जागेवरच व्यवस्थापन (कंपोस्ट / बायोगॅस / बायोचार अशी तंत्रे वापरून).

सांडपाण्यावर १०० टक्के प्रक्रिया करून या पाण्याचा बांधकामासाठी वापर करून स्थानिक गोड्या पाण्याच्या स्त्रोतांवरील भार कमी करणे. 

विजेचे कार्यक्षम, सातत्यपूर्ण आणि स्वच्छ स्त्रोत आणि शाश्वत पाणी पुरवठा. 

जेथे शक्य असेल तेथे (निवासी वसाहतींत शक्यतो १०० टक्के) पावसाचे पाणी साठवणे.

असलेले भूजलवाहक, नैसर्गिक व सांस्कृतिक वारसा क्षेत्रे आणि आपल्या टेकड्या आणि नद्यांचे संवर्धन व संरक्षण. 


या यादीत आणखीही भर घातली जाऊ शकते. या गुगल फॉर्मद्वारे आपण आपल्या सूचना पाठवू शकता. 


जोपर्यंत हे सारे होत नाही, तोपर्यंत आपल्या नैसर्गिक परिसंस्थेची मोडतोड करणाऱ्या आणि गडद काळ्या भविष्याचे कृत्रिम हिरवे चित्र रंगवणाऱ्या कोणत्याही सुशोभित नदीकाठ प्रकल्पाची आपल्याला गरज नाही!


पौर्णिमा आगरकर.


PS: Marathi translation by Dr Priyadarshini Karve .


www.samuchit.com

Like/Follow/Share us on FacebookInstagramTwitter  Citizens of Sustainable Pune


No comments:

Post a Comment