Friday, April 21, 2017

MUSINGS FROM PRIYADARSHINI KARVE: स्वयंपाकासाठी स्वच्छ ऊर्जा

जगभरात अजूनही ३ अब्ज लोक चुलींवर स्वयंपाक करतात. जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार दरवर्षी किमान ४३ लाख अकाली मृत्यूंचा थेट संबंध चुलीच्या धुराच्या संपर्काशी आहे, आणि अर्थातच यामध्ये चुलीजवळ अधिक काळ घालवणाऱ्या महिला, आणि त्यांच्याच आजुबाजूला वावरणारी लहान मुले यांचाच प्रामुख्याने समावेश होतो. याशिवाय धुराच्या संपर्कामुळे जीवघेणे नाही, तरी आयुष्यातील आनंद हिरावून घेणारे इतरही अनेक आजार (उदा. दीर्घकालीन खोकला, दृष्टी अधू होणे, इ.) होऊ शकतात, आणि याच्या परिणामांना चुलीवर स्वयंपाक करणाऱ्या सर्वच महिलांना तोंड द्यावे लागते. याच कारणामुळे २०१५ मध्ये जगातील सर्व देशांनी एकत्रितपणे स्वीकारलेल्या जागतिक पातळीवरील शाश्वत विकास लक्ष्यांमध्ये ऊर्जेसंबंधीच्या लक्ष्यात स्वयंपाकाच्या ऊर्जेला विशेष स्थान देण्यात आले आहे. ऊर्जा म्हणजे केवळ वीज नव्हे, हे या निमित्ताने लक्षात घ्यायला हवे.

लाकूडफाट्यावर चालणारी पारंपरिक चूल
ही झाली जागतिक पातळीवरची आकडीवारी. भारताचा विचार केल्यास अजून जवळ जवळ ७० टक्के घरांमध्ये चुलीवर स्वयंपाक होतो. ग्रामीण भारतात ९० टक्के घरांमध्ये चुली आहेत. चुलींच्या धुराचा महिला आणि बालकांच्या आरोग्यावर होणारा अनिष्ट परिणाम ही त्यामुळे भारतासाठी अत्यंत चिंताजनक बाब आहे. यावर मात करण्यासाठी शासकीय पातळीवरून १९८० पासून अनेक योजना राबवल्या गेल्या आहेत. त्यातून बायोगॅस संयंत्रे, सुधारित चुली, निर्धूर शेगड्या, आधुनिक शेगड्या अशा विविध प्रकारच्या तंत्रांवर देशभरात संशोधन झाले, आणि अनेक पर्याय पुढे आले. हे पर्याय लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी साधारण २००५ पर्यंत शासकीय अनुदाने आणि त्यानंतरच्या काळात बाजारपेठेच्या माध्यमाचा वापर केला गेला आहे. सध्या उज्ज्वला योजनेचा मोठा बोलबाला आहे. या योजनेच्या माध्यमातून भारतात दारिद्र्यरेषेखालील एकूण ५ कोटी लोकांना (दारिद्र्य रेषेखालील एकूण लोकसंख्येच्या ५० टक्के) एलपीजीची जोडणी दिली जात आहे.

स्वयंपाकासाठी भारतात आजवर विविध प्रकारची इंधने वापरली गेली आहेत. लाकूडफाटा, शेतातला काडीकचरा, शेणाच्या गोवऱ्या यासाऱख्या घन स्वरूपातील इंधनांच्या वापरातून कितीही चांगली चूल किंवा शेगडी वापरली तरी काही प्रमाणात तरी प्रदूषण होतेच. केरोसिन हे स्वच्छ इंधन आहे, असे बराच काळ मानले जात असे, पण आता मात्र केरोसिन किंवा इतरही द्रव इंधनाच्या वापरातूनही अतिशय घातक व कर्करोगजनक असे प्रदूषण बाहेर पडते, असे दिसून आले आहे. त्यामुळे जागतिक पातळीवर केरोसिनचा स्वयंपाकासाठी वापर कमी करण्यावर आता भर दिला जातो आहे. पूर्णतः प्रदूषण विरहित स्वयंपाक करायचा असेल, तर वायुरूप इंधनाला पर्याय नाही. त्यादृष्टीने सध्या भारतात एलपीजीचा ग्रामीण भागात वापर वाढवण्यावर भर दिला जातो आहे, आणि शहरी भागात नळीतून पुरवठा करता येणाऱ्या नैसर्गिक वायूकडे वळण्यास सुरूवात झाली आहे. जागतिक पातळीवर विजेचा स्वयंपाकासाठी वापर करण्यावरही भर दिला जातो आहे, आणि भारतातही जसजशी वीजपुरवठ्याची परिस्थिती सुधारते आहे, तसतश्या शहरी आणि ग्रामीण भागातही विजेवर चालणाऱ्या इंडक्शन शेगड्या लोकप्रिय होत आहेत.

पण यातून काही प्रश्नही उभे रहात आहेत.

लाकूडफाटा, काडीकचरा, इ. चा इंधन म्हणून वापर करण्यातला सर्वात मोठा फायदा म्हणजे ही इंधने लोकांना त्यांच्याच आजुबाजूच्या परिसरातून गोळा करून मिळवता येतात. त्यासाठी वेळ खर्च होतो, पण उचलून पैसे द्यावे लागत नाहीत. काही ठिकाणी सरपण विकतही घ्यावे लागत असले, तरी ते स्थानिक बाजारपेठेत मिळते, व त्याच्या किमतीबाबत आणि किंमत चुकती करण्याच्या पध्दतीबाबत (उदा. उधारी, हप्ते, इ.) विक्रेता आणि ग्राहक परस्परांची सोय बघून काही तडजोडी करू शकतात. एकदा एलपीजी किंवा विजेचा स्वयंपाकासाठी वापर सुरू झाला, की या इंधनांच्या पुरवठ्यासाठी ग्राहक वेगळ्या यंत्रणेवर अवलंबून रहातो. या इंधनांची किंमत ताबडतोब पैशाच्या रूपात चुकवावी लागते, इंधनाची किंमत ठरवणे तसेच मोबदल्याचे वेळापत्रक ठरवणे, ह्या गोष्टी पूर्णपणे पुरवठादार यंत्रणेच्या अखत्यारीत आहेत. ग्राहकाच्या क्रयशक्तीचा यात काहीही विचार होत नाही.

चुलीवरचा स्वयंपाक जमिनीवर बसून केला जातो, तर गॅसचा प्रवाह योग्य पध्दतीने वहावा यासाठी एलपीजीची शेगडी ओट्यावर किंवा टेबलावर ठेऊन वापरावी, असा सल्ला दिला जातो. त्यामुळे स्वयंपाकघरात चुलीच्या जागी एलपीजीची शेगडी येणे हा केवळ इंधनातला बदल नाही, तर संपूर्ण स्वयंपाक करण्याच्या पध्दतीतील बदल आहे. शिवाय भाकरीसारखे काही पारंपरिक पदार्थ एलपीजीच्या शेगडीवर करणे अडचणीचे होते, ही एक वेगळीच समस्या आहे.

एकीकडे आपण पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून पेट्रोलियम इंधनांचा वापर कमी करून नूतनक्षम इंधनांच्या वापराकडे जाऊ पहात आहोत, पण स्वयंपाकाच्या इंधनाच्या बाबतीत मात्र आपण नूतनक्षम अशा जैवभाराकडून पर्यावरणाच्या दृष्टीने प्रदूषक अशा पेट्रोलियम इंधनांकडे जातो आहोत, हाही एक विरोधाभासच आहे.

असे अनेक बारकावे या संक्रमणात आहेत, ज्यांची फारशी चर्चा होताना दिसत नाही. पण या साऱ्याचा एकत्रित परिणाम असा होतो, की विशेषतः ग्रामीण घरात एलपीजीची जोडणी किंवा इंडक्शन शेगडी आली, तरी इतर पारंपरिक स्वयंपाक साधनांचा वापरही चालूच रहातो. याला संशोधकांनी स्टोव्ह स्टॅकिंग, किंवा शेगड्यांची उतरंड असे नाव दिले आहे. सध्या जगभरात हा चर्चेचा आणि चिंतेचा विषय ठरला आहे.

एकाच स्वयंपाकघरात पारंपरिक चूल
व गॅसची शेगडी या दोन्हीचा वापर 
घरात जर विविध स्वयंपाक साधने वापरली जात असतील, तर त्यातील जी शेगडी सगळ्यात जास्त प्रदूषण करणारी आहे, तिच्यावर स्वयंपाकघरातील हवेची शुध्दता अवलंबून आहे. पश्चिम महाराष्ट्रात अगदी सर्रास दिसणारे दृष्य म्हणजे भाकरी करण्यासाठी पारंपरिक चूल पेटवली जाते, आणि बाकीचा स्वयंपाक एलपीजीच्या शेगडीवर केला जातो. अडीअडचणीला उपयोग पडणारा केरोसिनचा स्टोव्हही घरात असतो, आणि तोही अधूनमधून वापरला जातो. स्वयंपाकातील इतर कोणत्याही पदार्थांपेक्षा कुटुंबातील सर्वांसाठी भाकऱ्या करायला जास्त वेळ लागतो. त्यामुळे सर्वात जास्त वापर होणारे स्वयंपाक साधन आहे, पारंपरिक चूल. पण त्या घरात एलपीजीची जोडणी आहे, म्हणून तिथला स्वयंपाकघरातील प्रदूषणाचा प्रश्न सुटलेला आहे, असा दावा केला जाणार आहे, जो अर्थातच चुकीचा असेल. अशी उदाहरणे जगभरात दिसून येत आहेत, आणि त्यामुळे महिलांच्या व बालकांच्या आरोग्याचा प्रश्न खरोखर सोडवायचा असेल, तर प्रत्यक्ष स्वयंपाकघरात काय घडते आहे, याचा अभ्यास करण्याची गरज आता संशोधकांना दिसू लागली आहे.

या बरोबरच सहजगत्या मिळू शकणाऱ्या जैव कचऱ्यापासूनही एलपीजीच्या दर्जाची स्वच्छ ऊर्जा मिळवता येईल का, यावरही संशोधन चालू आहे. यापैकी एक पर्याय भारतात आपल्या परिचयाचा आहे, आणि तो म्हणजे बायोगॅस संयंत्र. दुसरा पर्याय आहे, घन स्वरूपातील लाकूडफाटा, काडीकचरा यांच्यापासून आधी इंधनवायू निर्माण करणे, आणि मग तो जाळून स्वयंपाकासाठी ऊर्जा मिळवणे. या दोन्ही पर्यांयाबाबत सध्या जागतिक पातळीवर आणि भारतात काय परिस्थिती आहे, याचा थोडक्यात आढावा पुढे देत आहे.

खरकट्या अन्नावर चालणारे बायोगॅस संयंत्र -
शहरी भागात गच्चीवर ठेवलेले
खरकट्या अन्नावर चालणारे बायोगॅस संयंत्र -
ग्रामीण भागात अंगणात बांधलेले
ग्रामीण भागात शेणावर चालणाऱ्या बायोगॅसबद्दल बहुतेकांना माहित आहेच, पण स्वयंपाकघरातील भाजीपाल्याचा कचरा, खरकटे अन्न, इ. ओल्या कचऱ्यावर चालणारी बायोगॅस संयंत्रेही बनवता येतात. विशेषतः शेतीच्या कामासाठी गुरांची संख्या झपाट्याने कमी होत आहे, त्यामुळे शेणाच्या बायोगॅसपेक्षा ओल्या कचऱ्यावर चालणाऱ्या बायोगॅसचे महत्व वाढले आहे. ह्या प्रकारचे बायोगॅस संयंत्र शहरी तसेच ग्रामीण भागात, जिथे कुठे पुरेश्या प्रमाणात ओला कचरा एका ठिकाणी उपलब्ध आहे, अशा ठिकाणी बसवता येऊ शकते. घरगुती स्वयंपाकासाठी हे संयंत्र जिथे स्वयंपाकघराजवळ योग्य जागा उपलब्ध आहे, तिथे वापरता येते. पण याचा मुख्य फायदेशीर उपयोग हा अन्न प्रक्रिया उद्योगातील व्यावसायिकांना (उदा. मिठाया व फरसाणचे उत्पादक, जेवणाचे डबे बनवून देणारे व्यावसायिक, शाळांना माध्याह्न भोजन पुरवणाऱ्या संस्था, लहान उपहारगृहे, वसतिगृहे किंवा वृध्दाश्रम किंवा आश्रमशाळांसारख्या ठिकाणची स्वयंपाकघरे, इ.) होऊ शकतो.

युरोपात विशेषतः जर्मनीमध्ये बायोगॅस निर्मितीबाबत बरेच संशोधन झाले आहे. कोणत्याही प्रकारच्या हिरव्या पाल्यापासून मोठ्या प्रमाणावर बायोगॅस निर्मिती, व त्या बायोगॅसचा वापर करून वीजनिर्मिती अशी मुख्यतः या संशोधनाची दिशा राहिलेली आहे. चीन व इतर काही आशियाई व आफ्रिकी देशांमध्ये मात्र भारताप्रमाणेच पाळीव प्राण्यांच्या विष्ठेपासून बायोगॅस निर्मिती, आणि त्या गॅसचा स्वयंपाकासाठी वापर यावर भर दिला जातो. भारतात आपण फक्त गाई-म्हशींच्या शेणाचाच विचार केला आहे, तर या देशांमध्ये गुरांच्या शेणाबरोबरच, डुकरांच्या व इतर प्राण्यांच्या विष्ठेचाही वापर होतो. मानवी विष्ठेवरही बायोगॅस निर्मिती होऊ शकते, आणि याचे यशस्वी प्रयोग भारतात झाले आहेत. पण या पर्यायाला इथे फार प्रतिसाद मिळालेला नाही. नेपाळमध्ये मात्र अशा प्रकारची बायोगॅस संयंत्रे बऱ्याच ठिकाणी घरगुती पातळीवरही लोकांनी अंगीकारलेली आहेत.

भारतातही काही अंशी शहरी भागातील सेंद्रीय घन कचऱ्याच्या विल्हेवाटीसाठी मोठ्या (दररोज कित्येक टन कचरा जिरवू शकणाऱ्या) बायोगॅस संयंत्रांचा पर्याय वापरला जातो, पण तो आर्थिक दृष्ट्या फारसा व्यवहार्य नाही. त्यापेक्षा जिथे ओला कचरा निर्माण होतो आहे, तिथेच त्याचे गॅसमध्ये रूपांतर करून त्याच ठिकाणची उष्णतेची गरज भागवण्यासाठी त्या गॅसचा वापर करणे, हे आर्थिक दृष्ट्या आणि पर्यावरणीय दृष्ट्या अधिक फायद्याचे आहे. शिवाय या संयंत्रातून बाहेर पडणाऱ्या मळीच्या रूपाने एक चांगले सेंद्रीय खतही उपलब्ध होते, हा एक अतिरिक्त फायदाही आहेच.

पण बायोगॅस संयंत्र चालवण्यासाठीही काही कष्ट घ्यावे लागतात. सिलेंडर शेगडीला जोडला आणि गॅसचा प्रवाह सुरू केला की झाले, इतके ते सोपे नाही. शेण किंवा ओल्या कचऱ्याचा मऊ लगदा करून तो संयंत्रात रोज घालावा लागतो, बाहेर पडणाऱ्या मळीची योग्य विल्हेवाट लावावी लागते, घरात एखादा पाळीव प्राणी असल्यास त्याची जशी निगा राखावी लागते, तशीच या संयंत्राची निगा राखावी लागते. बायोगॅस संयंत्राच्या वापरात सोपेपणा आणणे अशक्य आहे, असेही नाही. पण सध्यातरी या दृष्टीने काही फार संशोधन चालू असलेले दिसत नाही. किंबहुना, सध्याच्या शासकीय धोरणात एलपीजीवरच सगळा भर दिलेला असल्याने बायोगॅस किंवा स्वयंपाकाच्या इंधनांच्या इतर पर्यायांवरही नवे संशोधन करण्यासाठी कोणतेही प्रोत्साहन राहिलेले नाही, ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे.

दुसरा पर्याय आहे, घन जैविक पदार्थांपासून इंधनवायू तयार करून स्वयंपाकासाठी त्याचा वापर करण्याचा. यासाठी गॅसिफायर शेगड्यांवर गेल्या दहा-बारा वर्षांत जगभरात बरेच संशोधन झाले आहे. एका अर्थाने पारंपरिक चूलही काही अंशी गॅसिफायरच आहे. आपण चुलीत सरपण पेटवतो, तेव्हा सगळे इंधन एकदम पेटत नाही. एक-दोन तुकडे पेटतात, आणि त्या उष्णतेमुळे आजुबाजूच्या लाकडाचे बाष्पीभवन होते, त्यातील ज्वलनशील पदार्थ वायूरूपात बाहेर पडतात. हा गरम वायू हवेच्या संपर्कात आला की पेट घेतो. आपल्याला लाकडातून ज्या ज्वाळा बाहेर पडताना दिसतात, त्या म्हणजे हा जळणारा वायू असतो. सुधारित चुलीमध्ये सरपणाचे जास्तीत जास्त प्रमाणात ज्वलनशील वायूमध्ये रूपांतर करून, हा वायू पूर्णतः जळावा, ह्या दृष्टीने पारंपरिक चुलीची रचना बदलली जाते.

दोन तोंडांची धुराड्याची चूल
जळणाऱ्या सरपणाजवळची हवा गरम होते, आणि ती वरच्या दिशेने प्रवास करते. त्यामुळे ज्वाळा चुलीवर ठेवलेल्या भांड्याकडे जात असतात. हा झाला चुलीत असलेला हवेचा नैसर्गिक झोत. केवळ नैसर्गिक झोताने आपण लाकडाच्या ज्वलनाची गुणवत्ता किती सुधारू शकतो, यावर मर्यादा आहेत. संशोधकांनी दाखवून दिले आहे, की जर चुलीतून वहाणाऱ्या हवेच्या प्रवाहाचा वेग वाढवला तर गॅसिफिकेशन आणि त्यामुळे ज्वलन अधिक चांगले होते. म्हणजेच चुलीतून होणारे प्रदूषण कमी होते. त्यामुळे आधी चुलींना धुराडे बसवण्याचा उपाय पुढे आला. पण यामुळे किती सुधारणा होऊ शकते यावरही मर्यादा आहे. शिवाय चुलींना धुराडे बसवणे, ते स्वच्छ ठेवणे, यामध्ये काही व्यावहारिक अडचणी आहेत.

फोर्स्ड ड्राफ्ट शेगडी
मग दुसरा उपाय पुढे आला, तो म्हणजे चुलीला पंखा किंवा ब्लोअर बसवणे. या पध्दतीने आपण हवेचा प्रवाह पाहिजे तसा नियमित करू शकतो. या प्रकारच्या काही शेगड्यांच्या मदतीने एलपीजीच्या दर्जाची स्वच्छ ऊर्जा मिळवता येते, हे आता सिध्द झाले आहे. अशा शेगड्यांना फोर्स्ड ड्राफ्ट गॅसिफायर शेगड्या असे म्हटले जाते. आता अशा शेगड्यांचे तंत्रज्ञान जागतिक पातळीवर उपलब्ध झाले आहे, त्यांचे उत्पादन करणारे आंतरराष्ट्रीय उद्योजकही आता उभे राहिले आहेत. त्यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवरून एक विचार प्रवाह असा आहे, की जर घनरूपातील जैव इंधने वापरायचीच असतील, तर अशा प्रकारच्या फोर्स्ड ड्राफ्ट शेगड्याच फक्त वापरल्या गेल्या पाहिजेत. पण या विचार प्रवाहाची अंमलबजावणी करण्यातही अनेक व्यावहारिक समस्या आहेत. सर्वाच महत्वाची गोष्ट म्हणजे एलपीजीच्या दर्जाची स्वच्छ ऊर्जा मिळवण्यासाठी या शेगडीत कोणतेही घन जैव इंधन वापरून चालत नाही, तर त्यासाठी विशिष्ट पध्दतीने बनवलेल्या जैवभाराच्या पेलेट्स वापराव्या लागतात. म्हणजे लोकांना त्यांच्या परिसरात सहजगत्या उपलब्ध असलेली घन जैव इंधने वापरता येणार नाहीतच, तर पेलेट्स विकतच घ्यावा लागतील. जैवभारापासून पेलेट्स बनवण्याचे तंत्रज्ञान सोपे आणि स्वस्त नाही. त्यासाठी कारखान्यासारखी यंत्रणा आवश्यक आहे, म्हणजेच ह्या इंधनाच्या निर्मितीचा कारखाना त्या ग्रामीण भागापासून लांब उभारावा लागेल. म्हणजे एलपीजी सिलेंडर देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवण्याचे आव्हान आणि अशा प्रकारच्या पेलेट्स पोहोचवण्याचे आव्हान गुणात्मक दृष्ट्या सारखेच आहे. एलपीजीसाठी ज्याप्रमाणे खिशातून पैसे खर्च करावे लागतात, त्याप्रमाणेच या पेलेट्सही विकतच घ्याव्या लागणार आहेत. दुसरी महत्वाची बाब म्हणजे फोर्स्ड ड्राफ्ट स्टोव्हचा पंखा किंवा ब्लोअर चालवण्यासाठी विजेची गरज आहे. विजेची खात्रीशीर आणि स्वस्त उपलब्धता ही या प्रकारच्या शेगड्या वापरता येण्यासाठी पूर्वअट असेल, तर बऱ्याच भागात या शेगड्यांचा पर्याय अजूनतरी व्यवहार्य ठरू शकत नाही.

वृध्दाश्रमात वापरात असलेली
इएलएफडी संपदा शेगडी
काही अंशी या प्रश्नांवर उत्तर शोधण्याचा एक प्रयत्न समुचित एन्व्हायरो टेकच्या माध्यमातून आम्ही केला आहे. आम्ही एक शेगडी विकसित केली आहे, ज्यात विविध प्रकारच्या घन स्वरूपातील जैव इंधनांचा वापर करता येतो. तसेच फोर्स्ड ड्राफ्टचा परिणाम साध्य करण्यासाठी पाण्याच्या वाफेचा उपयोग केलेला आहे. यासाठी लागणारी पाण्याची वाफ करण्यासाठी शेगडीच्याच उष्णतेचाच वापर केलेला आहे. म्हणजेच ही शेगडीही एलपीजीच्या ऊर्जेच्या दर्जाच्या जवळपास जाते, पण त्यासाठी विशिष्ट विकत घेतलेल्या इंधनाचीही गरज नाही, आणि विजेच्या उपलब्धतेवरही या शेगडीचा वापर अवलंबून नाही.

जागतिक पातळीवर अशा प्रकारचे संशोधन पहिल्यांदाच झालेले आहे. सध्या आम्ही व्यावसायिक किंवा संस्थात्मक पातळीवर वापरता येईल अशी शेगडी बाजारात आणली आहे, घरगुती वापरासाठीच्या शेगडीवर काम चालू आहे.

समुचित इएलएफडी संपदा शेगडीसंबंधीचे व्हिडिओ बघा या लिंकवर.


थोडक्यात म्हणजे एलपीजी वापरणाऱ्या घरांमध्येही काही प्रमाणात जैव इंधने वापरात रहाणारच आहेत. त्यामुळे जैव इंधनांपासून स्वच्छ ऊर्जा मिळवण्याच्या तंत्रांवरील संशोधन, या स्वयंपाक साधनांचे व्यवसाय, इ. मधील ज्ञानाची आणि आर्थिक गुंतवणूक कमी करणे आपल्याला परवडणारे नाही. केवळ एलपीजीच्या जोडण्यांची संख्या वाढवली म्हणजे स्वयंपाकाच्या ऊर्जेचा प्रश्न सुटला असे समजणे म्हणजे हजारो महिला आणि बालकांच्या जिवाशी खेळणे आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर ही जाणीव वाढते आहे, पण दुर्दैवाने आज तरी भारतात या वास्तवाकडे दुर्लक्ष केले गेलेले आहे. ही चूक जितक्या लवकर सुधारेल, तितके आपण ऊर्जेशी संबंधित शाश्वत विकासाचे लक्ष्य गाठण्याच्या जवळ पोहचू.


प्रियदर्शिनी कर्वे
समुचित एन्व्हायरो टेक, पुणे

#BeModernBeResponsibleBeRespectful

    Samuchit Enviro Tech.     samuchit@samuchit.com     www.samuchit.com 

No comments:

Post a Comment