Sunday, November 12, 2017

MUSINGS FROM PRIYADARSHINI KARVE: आपल्या मुलांसाठी आपण कसे जग मागे ठेवणार आहोत?

SUSTAINable Life हा ब्लॉग सुरू करून आता तीनेक वर्षे झाली. सुरूवातीला दर आठवड्याला एकदा तरी मी स्वतः लिहायचे असे ठरवले होते, पण हळुहळू त्यात खंड पडत गेला, आणि आता तर काही महिन्यांच्या अंतराने लिहिते आहे. पण हरकत नाही, तीव्रतेने काही बोलावेसे वाटते, त्यावेळीच बोलणे जास्त चांगले. नाहीतर जबरदस्तीने एक संकल्प म्हणून काहीतरी विषयाचे दळण दळत बसणेही योग्य नाही ! 

१४ नोव्हेंबर हा पंडित जवाहरलाल नेहरूंचा जन्मदिवस आपल्या देशात बालदिन म्हणून साजरा केला जातो. या निमित्ताने मुलांसाठी अनेक कार्यक्रम होतात, आणि त्यांना अनेक लोक विविध प्रकारचे ज्ञानामृतही पाजतात. पण या बालदिनाच्या निमित्ताने मोठ्या माणसांनी एका प्रश्नावर विचार करावा, असे मी आवाहन करते आहे.

आपण आपल्या मुलांसाठी कसे जग मागे ठेवणार आहोत?

या शतकाच्या मध्यापर्यंत जगाची लोकसंख्या साधारण १०-१२ अब्ज होईल, आणि मग ती स्थिरावेल, असे सध्याची आकडेवारी दर्शवते. 

ही गोष्ट खूप महत्वाची आहे. अमुक अमुक देशातले, किंवा अमुक अमुक विचारसरणीचे लोक खंडीभर मुले जन्माला घालत आहेत, हीच जगापुढची किंवा देशापुढची मुख्य समस्या आहे, असे मानणाऱ्यांनी ही आकडेवारी विशेष लक्षात घ्यायला हवी. जगाच्या काही भागात लोकसंख्या वाढते आहे, आणि या शतकाच्या अखेरपर्यंत ती वाढत राहील हे अगदी खरे आहे. भारताचाही या भागात समावेश होतो. पण ही लोकसंख्या वाढ केवळ जननदर जास्त आहे म्हणून होणारी वाढ नाही. जगभरात सर्वत्र (भारतातही) गेल्या काही दशकांत जननदर खाली आलेले आहेत. काही ठिकाणी ते बरेच खाली आले आहेत, तर काही ठिकाणी कमी प्रमाणात, पण एकंदर कल जननदर कमी होण्याचाच आहे, आणि 'आपली' लोकसंख्या वाढवली पाहिजे वगैरे सल्ले देणाऱ्या माथेफिरूंना न जुमानता समाजाच्या सर्व स्तरांमध्ये तो तसाच कमी होतो आहे.

जननदर खाली येऊनही लोकसंख्या वाढताना दिसते, कारण लोकांचे आयुष्यमानही वाढले आहे. ही निश्चितच चांगली गोष्ट आहे. अर्थात जगभरात जननदर आपोआप खाली आलेला नाही, तर त्यासाठी अनेक लोकांनी प्रयत्न केले आहेत. गर्भनिरोधक साधनांवर संशोधन करणारे शास्त्रज्ञ, त्यांची निर्मिती करणाऱ्या कंपन्या,  ही साधने लोकांपर्यंत पोहोचवणाऱ्या यंत्रणा, सर्वात महत्वाचे म्हणजे जनजागृती करणाऱ्या संस्था, आणि या सर्वांना मदत करणारी सरकारे व आंतरराष्ट्रीय संस्था, इ. सर्वांच्या कित्येक दशकांच्या प्रयत्नांचे हे फळ आहे. आणि अजूनही हे प्रयत्न तितक्याच जोमाने चालू रहाणेही आवश्यकच आहे. पण लोकसंख्येकडे भयंकर मोठी समस्या वगैरे म्हणून पहाण्याचा काळ आता गेला. यापुढे आपल्याला साधारण १०-१२ अब्ज मानवांच्या कल्याणाचा विचार करायचा आहे, असा निश्चित आकडा माहित असणे  हे जागतिक पातळीवरील नियोजनासाठी सोपे आहे. अनेक संशोधकांनी दाखवून दिले आहे, की १०-१२ अब्ज मानवांना सुखाने जगता येईल इतकी संसाधने पृथ्वी आपल्याला निश्चित व निरंतर पुरवू शकते. आधुनिक विज्ञान व तंत्रज्ञानही यामध्ये महत्वाची भूमिका बजावते आहे.

जिज्ञासूंनी जरूर पहावा असा हा दुवा. 

मग असे असूनही घोडे कुठे पेंड खाते आहे?

Image result for inequality in resources
लोकसंख्येपेक्षाही मोठी आणि अजूनही परिणामकारक उपाययोजना न सापडलेली अशी समस्या म्हणजे आपली हाव. सध्याचे साधारण ७.५ अब्ज आणि उद्याचे १०-१२ अब्ज यामध्ये फक्त साधारण २ अब्ज लोकच आपली चैनीची भूक भागवण्याइतके आर्थिक व राजकीय दृष्ट्या सबल होऊ शकतात. उरलेल्या लोकांमध्येही हाव आहेच, फक्त ती पूर्ण करण्याचे मार्ग नसल्यामुळे प्रचंड असंतोष आहे. 




आता तुम्हाला वाटेल की २ अब्ज लोकच सुखी जीवन का जगू शकतात, इतर लोकही मेहनतीने आपली आर्थिक परिस्थिती सुधारू शकतील की. गेल्या काही दशकांत चीन आणि भारताने नेत्रदीपक प्रगती करून हे दाखवून दिले आहे. पण ज्या काळात चीन आणि भारताची भरभराट होत गेली आहे, त्या काळात आधी शिखरावर असलेल्या अमेरिका, युरोपीय देश, इ.ना आर्थिक व राजकीय उलथापालथींना तोंड द्यावे लागले आहे. आपला उत्कर्ष होण्यासाठी दुसऱ्या काहींना उत्कर्षाच्या शिखरावरून पायउतार व्हावे लागले आहे. आणि अर्थातच उद्या कदाचित दुसऱ्या काही देशांसाठी आपल्यालाही खाली उतरावे लागेल.

इतिहास बाजूला ठेऊन शास्त्रीय विचार केला तरी यालाच दुजोरा मिळतो. पृथ्वीवरील संसाधनांच्या उपलब्धतेशी जीवनशैलीच्या गरजांची सांगड घातली तर असे दिसते की शहरी अमेरिकन-युरोपियन पध्दतीची जीवनशैली केवळ २ अब्ज माणसांनाच पोसू शकते. त्यामुळे १०-१२ अब्जांमध्ये हे भाग्यवान २ अब्ज कोणी बनायचे, ही चढाओढच आज मानवी संस्कृतीच्या केंद्रस्थानी आहे. वर पोहोचलेल्या २ अब्जांची असुरक्षिततेची भावना आणि खाली असलेल्या ८-१० अब्जांमधला खदखदता असंतोष यांच्या संघर्षात एखाद्या माथेफिरू राज्यकर्त्याने अण्वस्त्रांची ठिणगी टाकली, तर मानवजातीचे अस्तित्वच संपुष्टात येईल.

यात आणखी एक महत्वाचा मुद्दा आहे. या संकटाची जाणीव झालेल्या बऱ्याच लोकांना असे वाटते की आपण भूतकाळातल्या मानवी जीवनशैलींकडे वळलो, तर आपण यावर मात करू शकू. पण शास्त्रीय विचार याला दुजोरा देत नाही. साध्या सोप्या शेतीवर आधारित ग्रामीण जीवनशैलीने किंवा अगदी त्या पूर्वीच्या परिसरातून रोज लागणारी संसाधने गोळा करण्याच्या आदिवासी जीवनशैलीने १०-१२ अब्ज लोकांना पोसता येणार नाही. त्या जीवनशैली त्या वेळी सुखाच्या होत्या, कारण त्यावेळी लोकसंख्या कमी होती. किंबहुना लोकसंख्येतल्या वाढीनेच मानवाला आधी आदिवासी जीवनशैली सोडून शेतीकडे वळवले, आणि मग वाढत्या तोंडांची भूक भागवण्यासाठी शेतीची उत्पादकता वाढवण्याच्या प्रयत्नांतून औद्योगिकरणाकडे वळवले. तेव्हा आता मागचे दोर कापले गेले आहेत. आपल्याला आता पुन्हा एकदा नव्या वाटा धुंडाळायला हव्यात.

थोडक्यात म्हणजे आज आपण सर्व जाणत्या आणि मोठ्या माणसांना आपल्या मुलांच्या भविष्यासाठी निवड करायची आहे. आपण कसे जग मागे ठेवणार आहोत? केवळ २० टक्के लोकांनाच आपल्या आशा आकांक्षा पूर्ण करण्याची संधी असेल, पण त्यासाठी प्रचंड संघर्ष, सततची असुरक्षितता, आणि नामशेष होण्याची भीती यांच्या छायेखाली सर्वांना जगावे लागेल... आणि कदाचित नष्ट व्हावे लागेल, असे जग आपल्याला वारसा म्हणून पुढे द्यायचे आहे का? की १० अब्ज लोक समाधानाने जगू शकतील, अशी काही नवी जीवनशैली निर्माण करून, शांत, समाधानी, मानवी बुध्दीच्या व मनाच्या सकारात्मक  सर्जनाला पूर्ण वाव देणारे असे जग आपल्याला मागे ठेवायचे आहे?

हा निर्णय सर्वस्वी तुमच्या आणि माझ्या हातात आहे. राज्यकर्ते, उद्योगधंदे, इ. सर्व सामान्य माणसाच्या मनोभूमिकेच्या तालावर नाचतात. आपण यंत्रणांना बदलायला भाग पाडू शकतो. हे शतक मनुष्यजातीच्या भवितव्याच्या दृष्टीने निर्णायक शतक आहे. या शतकात आपण जे निर्णय घेऊ, ज्या मूल्यांना महत्व देऊ त्यांचे दूरगामी परिणाम पुढील कित्येक शतके आपल्या पुढच्या पिढ्यांना निभावावे लागणार आहेत. एका अर्थाने आपण भविष्यातला इतिहास निर्माण करतो आहोत. बालदिनाच्या निमित्ताने या जबाबदारीला सामोरे जाण्याचा निर्धार करू या.

कसे असू शकेल हे नवे जग? कोणत्या वाटा आपल्याला त्या दिशेने घेऊन जातील? कोणत्या नव्या व्यवस्था त्यासाठी निर्माण कराव्या लागतील? समुचित एन्व्हायरो टेकच्या माध्यमातून मी या प्रश्नांना माझ्या परीने भिडते आहेच, पण तुमची मतेही जरूर कळवा! 

प्रियदर्शिनी कर्वे
समुचित एन्व्हायरो टेक, पुणे

#BeModernBeResponsibleBeRespectful

    Samuchit Enviro Tech     samuchit@samuchit.com     www.samuchit.com 

No comments:

Post a Comment