Tuesday, March 12, 2019

MUSINGS FROM PRIYADARSHINI KARVE: Environment Vs Development!

अपोलो ८ या नासाच्या चांद्रयानाने काढलेलं हे पृथ्वीचं छायाचित्र १९६८ साली प्रसिध्द झालं, आणि लोकांना अचानक पृथ्वीवासी असण्याचं महत्त्व जाणवलं. १९७०च्या दशकात पर्यावरण चळवळींना चालना मिळण्यामागे हे छायाचित्र हे एक महत्त्वाचं प्रेरणास्थान होतं. 

पर्यावरण की विकास, विकास की पर्यावरण, अशा प्रकारचे वाद अधून मधून डोकं वर काढतच असतात. पण मला वाटतं, हा वाद पर्यावरण की विकास असा नसतोच खरंतर. कारण पर्यावरण आणि विकास तुल्यबळ असतील, तर वादाला काहीतरी अर्थ आहे. मानवी जीवनाला अनुकूल पर्यावरण रहाणार नसेल, तर कोणत्याच तथाकथित विकासाला काही अर्थ रहाणार नसतो. त्यामुळे ज्या वादाला पर्यावरण विरुध्द विकास असं नाव दिलं जातं, तो बहुतेकवेळा सर्व माणसांचा सार्वकालिक विकास विरुध्द माझा तात्कालिक विकास असा वाद असतो.

एक साधं उदाहरण देते. मला माझ्या इच्छित आरंभस्थानापासून माझ्या इच्छित अंतिमस्थानापर्यंत माझ्या वाहनातून कमीत कमी वेळात, कमीत कमी खर्चात, व कमीत कमी कष्टात कसं जायचं, असा प्रश्न पडलेला असेल, तर मी कसा विचार करते? तर माझ्या प्रवासाच्या वेळेला माझ्या मार्गात असलेली वहातूक कोंडी कमीत कमी कशी होईल, मला प्रशस्त, मोकळा व रूंद रस्ता कसा मिळेल, या गोष्टी मला सर्वात महत्त्वाच्या वाटतात. माझ्या वाहनात एसी असल्यामुळे रस्त्यावर सावलीचा गारवा असणं-नसणं, चालणाऱ्यांना वगैरे आरामदायक वाटणं-न वाटणं, हे माझ्यासाठी गौण असतं. मला टेकडीला वळसा घालून जावं लागतंय, यात माझं पेट्रोल आणि वेळ खर्च होतोय, हे मला खुपत असतं. मला फक्त त्या रस्त्यावरून झूममम जायचंय, मग रस्त्याच्या कडेला दुकानं, फेरीवाले, विक्रेते यांच्या व्यवसायासाठी जागा आहे की नाही, किंवा तिथे रहाणाऱ्या लोकांना एकत्र येता येईल अशा मोकळ्या सार्वजनिक जागा आहेत का नाहीत, याच्याशी तर मला अजिबातच देणंघेणं नसतं. मग मला झाडं तोडून रस्ता रुंदीकरण, उड्डाणपूल, टेकडी फोडून बोगदे, इ. पर्याय आकर्षकच नाही तर तर्कशुध्द वाटू लागतात. पूर्वीच्या अनुभवातून मला हेही माहित असतं की हे सगळे उपाय केल्यानंतर मिळणारं सुख फार फार तर दोन-चार वर्षंच टिकेल, कारण इतर रस्त्यांवरची गर्दी या रस्त्यावर ओसंडून पुन्हा वहातूक कोंडी व्हायला लागेल. पण पुढचं पुढे, माझा आत्ताचा तर प्रश्न सुटेल, असा मी विचार करते. कोण जाणे, कदाचित आणखी दोन वर्षांनी मी वेगळ्या ठिकाणच्या वातानुकुलित काचेच्या इमारतीत चाकरी धरलेली असेल, किंवा मी शहराच्या आणखी उच्चभ्रू भागात घर घेतलेलं असेल, मग या रस्त्याशी माझा संबंधच रहाणार नाही, असाही कदाचित मी विचार केलेला असू शकतो.

पण समजा माझ्या मनात थोडा वेगळा प्रश्न आहे. मला असं वाटतंय की पुणे शहरात रहाणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला आपापल्या इच्छित आरंभस्थानापासून इच्छित अंतिमस्थानापर्यंत कमीत कमी खर्चात, कमीत कमी वेळेत, आणि कमीत कमी कष्टात जाता आलं पाहिजे. आणि हे केवळ आत्ताच नाही, तर कायमस्वरूपी घडावं अशीही माझी इच्छा असेल, तर मी कसा विचार करीन? मग माझ्या चटकन लक्षात येईल की, सार्वत्रिक व सार्वकालिक असा एकमेव उपाय म्हणजे शास्त्रीय दृष्ट्‍या शहरातील सध्याच्या चलनवलनाचा आणि भविष्यातील संभाव्य बदलांच्या शक्यतांचा अभ्यास करून तयार केलेला आराखडा, आणि त्याची शास्त्रशुध्द व तंत्रशु्ध्द अंमलबजावणी. यामध्ये रस्त्यांवर पादचारी, स्वचलित वाहने, विविध प्रकारच्या सार्वजनिक वाहनांचे परस्परपूरक जाळे यांना प्राधान्य असेल. रस्त्याचे जे इतर वापर माणसे करत असतात - उदा. व्यवसायाच्या व विपणनाच्या जागा म्हणून - त्यांचाही सहानुभूतीपूर्वक विचार केलेला असेल. खाजगी गाडी रस्त्यावर आणावी लागणार नाही, आणि तरीही कोणाचीही गैरसोय होणार नाही, अशी वाहतूक व्यवस्था माझा आणि सर्व समाजाचा सर्वाधिक फायदा करून देणारी असेल, या निष्कर्षाला मी येऊन पोहोचेन.

आपल्या मनातला नेमका विचार काय आहे, हे आपण प्रत्येकाने आत्मपरीक्षण करून पहावे. सर्वांनी सर्व काळ सर्व समाजाचा विचार केला पाहिजे, स्वार्थीपणा वाईट, इ. असा काहीही उपदेश मला करायचा नाही. शेवटी माझं भलं मी नाही पाहिलं, तर दुसरं कोण पहाणार आहे, हे मला पूर्णपणे पटतं. माझा मुद्दा इतकाच आहे, की दोन प्रकारच्या मानवी स्वार्थांमधल्या या आणि अशा प्रकारच्या इतर वादांत कोणती बाजू घ्यावी, हे ज्याने त्याने स्वतःच्या सदसद्विवेकबुध्दीच्या आधारे ठरवावे.



प्रियदर्शिनी कर्वे
समुचित एन्व्हायरो टेक



#BeModernBeResponsibleBeRespectful

   
Samuchit Enviro Tech.     samuchit@samuchit.com     www.samuchit.com