कोविड-१९ ची साथ सुरू झाली तेव्हापासून भारतात पुरेसे टेस्टिंग केले नाही, तर परिस्थिती अटोक्यात आणण्याच्या प्रयत्नांना यश मिळणार नाही, हा मुद्दा मी अनेकांशी बोलताना मांडला होता. काही लोकांना हे पटतं, काही लोक सरकारी आकडेवारीतल्या ठरावीक गोष्टींकडे बोट दाखवून आपण परिस्थिती फार चांगली हाताळतोय, सर्व काही चांगलं आहे, असा युक्तिवाद करतात. मागच्या महिन्यात कोविड-१९ने माझ्या कुटुंबात प्रवेश केला. आमचा रुग्ण सुदैवाने आता बरा झाला आहे. त्यांची लागण तुलनेने सौम्य होती, दवाखान्यात भरती व्हायची वेळ आली नाही, घरीच विलगीकरण आणि डॉक्टरांच्या सल्ल्याने काळजी घेऊन ही वेळ निभावून गेली. घरातील इतर लोकांनीही टेस्ट करून घेतल्या व त्या निगेटिव्ह आल्या. पण या निमित्ताने सरकारी यंत्रणा या बाबतीत काय करत आहेत, याचा मला स्वतःला अनुभव आला. या बद्दल लिहिण्याचा विचार करत असतानाच पुण्यातील सिरो सर्व्हेचे निष्कर्ष आले आहेत, आणि पुण्यात ज्या भागात सर्वात जास्त रुग्णसंख्या सातत्याने राहिली आहे, तिथे निम्म्याहून अधिक लोकांना कोविड-१९ ची बाधा होऊन गेली आहे, असे त्यात म्हटले आहे. यावरून अनेक चुकीचे निष्कर्ष काढले जात आहेत, हेही मला समाजमाध्यमातील प्रतिक्रियांवरून दिसते आहे. म्हणून आजचे हे कोविड पुराण.
प्रथम व्यक्तिगत अनुभवाबद्दल. कोविड-१९ ची चाचणी घेण्यासाठी ठिकठिकाणी यंत्रणा आहेत, पण आमच्या रुग्णाचे वय, व त्या वेळची अशक्तपणाची स्थिती लक्षात घेता आम्ही घरी बोलावून नमुना देण्याचा पर्याय निवडला. ह्याची पध्दत व्यवस्थित बसलेली आहे. मात्र सगळ्या गोष्टी व्हॉट्सॅपच्या माध्यमातून होत असल्याने इलेक्ट्रॉनिक माध्यमाच्या वापराची सवय नसलेल्यांसाठी हे जरा अवघड होऊ शकते, असे वाटले. चाचणीचा निकाल पॉझिटिव्ह आल्यानंतर तो आधी शासकीय यंत्रणेला कळवला जातो, आणि मग रुग्णाकडे पाठवला जातो. या पध्दतीचे नेमके प्रयोजन काय आहे? केवळ आकडेवारी अद्ययावत करणे, यासाठीच ही पध्दत आहे का?
मला एक किमान अपेक्षा अशी होती, की ज्या यंत्रणेकडे हा चाचणीचा निकाल जातो, त्यांच्याकडून निकालाच्या कागदावर असलेल्या दूरध्वनीवर ताबडतोब संपर्क साधला जाईल, आणि पुढे काय करायला हवे, कोणते पर्याय आहेत, याबद्दल काही प्राथमिक मार्गदर्शन केले जाईल.
आमच्या हाती चाचणीचा अहवाल आला तो पुण्यातल्या दुसऱ्या लॉकडाउनमधल्या शेवटचा काळ होता - शुक्रवार २४ जुलै. ह्या काळात पुण्यात रुग्णसंख्या टिपेला पोहचलेली होती. त्यामुळे शासकीय यंत्रणांवर ताण असणार हे मला अगदीच मान्य आहे. पण तरीही महानगरपालिकेकडून पहिला संपर्क साधला गेला तो सोमवारी, म्हणजे दोन दिवसांनंतर. हे माझ्या मते फार उशीरा आहे.
तोपर्यंत आम्ही विचार विनिमय करून डॉक्टरांच्या सल्ल्याने घरीच विलगीकरण करून रुग्णाची शुश्रुषा एकाच व्यक्तीने करायचा निर्णय घेतलेला होता. तापाचे आणि ऑक्सिजन पातळीचे सातत्याने मोजमापही घेत होतो. परिस्थिती बिघडू लागली तर कोणत्या हॉस्पिटलमध्ये जाता येईल, याचेही नियोजन केले होते. सोमवारी महानगरपालिकेकडून संपर्क होईपर्यंत ही सर्व घडी बसली होती, व रुग्णाची प्रकृती हळूहळू सुधारूही लागली होती. महानगरपालिकेच्या प्रतिनिधीने डॉक्टरांनी घरी विलगीकरण करायला परवानगी दिली आहे, याचा पुरावा फक्त मागितला, पण घरी विलगीकरण करणे शक्य आहे का, विलगीकरण म्हणजे नेमके काय करायचे याची घरातल्या लोकांना माहिती आहे का, याबाबत कोणतीही खातरजमा करून घेतली नाही. घरी थर्मामीटर आणि ऑक्सिमीटर आहे का, हाही प्रश्न विचारला नाही.
मात्र डॉक्टरांची शिफारस व्हॉट्सॅपवर पाठवल्यानंतर वेगाने हालचाली झाल्या. त्याच दिवशी दाराजवळ विलगीकरण असल्याचे स्टिकर लावले, त्यावर चाचणीचा निकाल आल्यापासून दोन आठवड्यांनंतरची तारीख टाकली गेली. घरात व इमारतीत निर्जंतुकीकरण केले गेले, घरातला कचरा उचलण्यासाठी वेगळी यंत्रणा कार्यरत केली गेली. या साऱ्या गोष्टी व्हायला हव्या तश्या झाल्या. त्यांनंतरही रोज महानगरपालिकेतून फोनवर रुग्णाच्या प्रकृतीची, तापमान आणि ऑक्सिजन पातळीची चौकशी केली जात होती. महानगरपालिकेच्या पथकाने इमारतीतील इतर रहिवाशांनाही भेट दिली व चाचणी करून घेण्याचा सल्ला दिला, असे नंतर शेजाऱ्यांनी सांगितले. या साऱ्या काळात पुणे महानगरपालिकेच्या ज्या ज्या कर्मचाऱ्यांशी प्रत्यक्ष किंवा फोनवर संपर्क आला, ते आपले काम तळमळीने, संयमाने व जिव्हाळ्याने करताना दिसले, हेही नमूद करायला हवे. सर्वांच्या चाचण्या करून घेणे, इतर काही अडचणी सोडवणे, इ. साठी पुण्यातील लोकप्रतिनिधींकडूनही चांगले सहकार्य मिळाले.
सोमवारीच पोलिस खात्याकडूनही फोनवर संपर्क झाला. त्यांनी रुग्ण व्यक्ती आधी कोठे बाहेर गेली होती का, संसर्ग कसा झाला असेल असे तुम्हाला वाटते, घरात इतर व्यक्ती कोण आहेत, त्याच मजल्यावर शेजारी रहाणाऱ्यांची नावे काय आहेत, या सर्वांनी चाचणी केली का, असे प्रश्न विचारले. कुटुंबातील व्यक्तींनी चाचणीचे नियोजन तोवर केलेले होते. संसर्ग कसा आणि केव्हा झाला असावा, याबद्दल नेमके काहीच कळत नव्हते. आम्हालाही याबाबत उत्सुकता होती. पोलिस आता कॉंटॅक्ट ट्रेसिंग करण्याच्या दृष्टीने प्रश्न विचारतील, त्यावरून आणखी लोकांच्या चाचण्या केल्या जातील, असा माझा होरा होता. पण यातले काहीच झाले नाही. घरातील लोकांनी चाचण्या केल्या का, हे विचारण्यासाठी पुढे दोन-तीन दिवस पोलिसांकडून फोन आले, पण चौकशी इतकीच काय ती झाली.
७ ऑगस्टला आमच्या रुग्णाचे विलगीकरण संपले. तोवर त्यांची प्रकृती बऱ्यापैकी सुधारलीही होती. रूग्ण व्यक्तीच्या मोबाईल फोनवरील आरोग्य सेतू ऍप या सर्व कालावधीत, तुम्ही सुरक्षित आहात, असा निर्वाळा देत होते, हे विशेष!
या सगळ्यामध्ये शासकीय यंंत्रणांच्या कामात मला दोन मोठ्या त्रुटी जाणवल्या.
१. रुग्ण घरी विलगीकरणात रहाणार असेल, तर किमान लेखी सूचनांचे पत्रक त्यांना व्हॉट्सॅपवर पाठवायला हवे. यामध्ये घरातील इतर लोकांनी काय काळजी घ्यायची ह्याचे मार्गदर्शन केलेले असावे. व्हिडिओद्वारे सुध्दा हे करायला हरकत नाही. प्रत्येक व्यक्तीला फोनवर प्रत्यक्ष सांगणे अडचणीचे असेल, हे मला मान्य आहे. पण जर व्हॉट्सॅप द्वारे रुग्णांकडून माहिती घेतली जात आहे, तर त्याच माध्यमातून माहिती दिलीही जाऊ शकते. रुग्णाची काळजी घेताना होणाऱ्या चुका टाळल्या तर एका रुग्णाकडून सर्व कुटुंबात संसर्ग पसरणे काही अंशी थांबू शकेल, आणि कुटुंबेच्या कुटुंबे एकत्र आजारी पडलेली दिसताहेत, ते काही प्रमाणात टाळता येईल.
२. पोलिसांनी किंवा महानगरपालिकेने कॉंटॅक्ट ट्रेसिंगची यंत्रणा उभी करून काटेकोरपणे राबवणे अत्यंत आवश्यक आहे. एकतर मोठ्या प्रमाणावर सरसकट चाचण्या घ्या. हे परवडत नाही, तर कॉंटॅक्ट ट्रेसिंग चांगले झालेच पाहिजे. प्रत्येक रुग्णाच्या संपर्कात आलेल्या किंवा संपर्काचा संशय असलेल्या सर्व व्यक्तींची ताबडतोब चाचणी, ही प्रक्रिया सुरूवातीपासून राबवली गेली असती, तर अनेकांचा आजार बळावण्यापू्र्वी त्यांचे निदान झाले असते, आणि गंभीर आजाराचे व मृत्यूचे प्रमाण कमी राखता आले असते. कोणतीही लक्षणे नसलेले पण हिंडते फिरते असल्याने इतरांना संसर्ग देणारे बाधितही सापडले असते, व त्यांचे विलगीकरण करूनही रोगाचा प्रसार थांबवता आला असता.
या साऱ्या अनुभवाच्या पार्श्वभूमीवर मी जेव्हा सिरो सर्व्हेचे निष्कर्ष पहाते, तेव्हा माझ्या विचारांना पुष्टीच मिळताना दिसते. कोणतीही लक्षणे नसलेले बाधित इतक्या मोठ्या संख्येने शहराच्या सर्वात कडक लॉकडाउन असलेल्या भागांमध्ये होते आणि ते सापडलेच नाहीत, हे कॉंटॅक्ट ट्रेसिंग अजिबात योग्य पध्दतीने झाले नाही आणि लोकांनी लॉकडाऊन योग्य पध्दतीने पाळला नाही, हेच दर्शवते. लॉकडाउनच्या काळात या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर सरसकट सर्वांचे टेस्टिंग करणे हा पर्यायही वापरला गेलेला नाही. त्यामुळे बाधितांची संख्या वाढतच गेली, हे महानगर पालिकेची यंत्रणा आणि आपण सारे नागरिक या सर्वांचे अपयश आहे.
अनेक लोकांना बाधा होऊनही फार त्रास झाला नाही, त्यामुळे कोविड-१९चा उगाचच बाऊ केला आहे, उगाचच लॉकडाऊन केला, अशी शेरेबाजी आता केली जाते आहे. पण रोगाचा प्रसार होतच गेला आणि त्यामुळे पुण्याच्या सामाजिक जीवनात महत्त्वाचे योगदान देणारे कितीतरी मोहरे आपण हकनाक गमावले, हेही विसरता कामा नये. आणि ज्या अनेक सर्वसामान्यांचे जीव गेले, तेही काही कमी मोलाचे नाहीत. त्यांच्या कुटुंबियांचे कधीही भरून न येणारे नुकसान झालेले आहे. लॉकडाउनही नसता, तर ही परिस्थिती आणखी किती हाताबाहेर गेली असती, हे सांगता येणे अवघड आहे.
कोविड-१९ मधून बरे झालेल्या अनेकांना आता इतर काही आजार होत आहेत, एकंदर आरोग्यावर झालेले इतर परिणाम आता डोके वर काढत आहेत, अशीही माहिती आता समोर येत आहे. बाधा होऊनही लक्षणे नसलेल्यांवर या विषाणूचे काही परिणाम झाले असतील का, याचा त्यांच्या दीर्घकालीन आरोग्यावर काही परिणाम होईल का, या प्रश्नांची उत्तरे आपल्याला अजून माहीत नाहीत. एकदा बाधा होऊन गेलेल्यांनाही पुन्हा बाधा होऊ शकते, असेही दिसलेले आहे. अशा परिस्थितीत हे लोक पुन्हा लक्षणांविना रहातील, की त्यांना आणखी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागेल, हेही पहावे लागेल.
एकंदरीतच पुण्यातील खूप मोठ्या संख्येने लोकांना कदाचित कोविड-१९ची बाधा होऊन गेली असल्याचे वृत्त हे आपल्याला आपल्या कोविड-१९ विरोधातील यंत्रणेतल्या त्रुटी दाखवते आहे, आणि सर्वांनी जास्त काळजी घ्यायला पाहिजे, हे सांगते आहे. याच्या उलट निष्कर्ष काढणे म्हणजे स्वतःच्या आणि इतरांच्या जीवाशी खेळणे आहे.
भारतात एकंदरच रुग्णसंख्या वाढतच चालली आहे. भारतात कोठेही खूप व्यापक प्रमाणावर टेस्टिंग होत नाही, आणि कॉंटॅक्ट ट्रेसिंगही योग्य पध्दतीने केले जात नाही. त्यामुळे भारतातील इतर ठिकाणच्या सिरो सर्व्हेचे निष्कर्षही असेच येतील. पण याचा अर्थ भारतात आता कळपाची रोगप्रतिकार शक्ती आली आहे, तर बिनधास्त सगळे सुरू करू, असा जर काढला, तर हे आणखी मोठ्या संकटाला आमंत्रण देणे ठरेल.
शांत डोक्याने विचार करा, पहा पटतंय का.
भारतातील कोविड-१९ साथीबाबतची विविध प्रकारची माहिती, इतर देशांशी तुलना, इ. पहाण्यासाठी
ही लिंक जरूर पहा. विशेषतः वेगवेगळ्या देशांमध्ये किती चाचण्या होत आहेत, आणि आपण त्यात कोठे आहोत, ही आकडेवारी तर पहाच पहा.
प्रियदर्शिनी कर्वे
संचालक
समुचित एन्व्हायरो टेक
#BeModernBeResponsibleBeRespectful
Samuchit Enviro Tech. samuchit@samuchit.com www.samuchit.com